Sadhi Mansa 09 september 2025 full written episode update

Sadhi Mansa 09 september 2025 full written episode update

निरूपाची पोलिसात जाण्याची धमकी

साधी माणसं’ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये, निरूपा घरातल्यांना बजावते की ती फक्त आजची रात्र थांबेल आणि उद्या सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करेल. हे ऐकून आजी आणि सुधाकर राव तिच्याकडे रागाने पाहू लागतात. आजी मीराला उद्देशून म्हणते, “हिला जेवढं भुंकायचं आहे तेवढं भुंकू दे, तू आतमध्ये चल.” पण जेव्हा आजी मीराला घेऊन जायला निघते, तेव्हा निरूपा तिला अडवते आणि म्हणते, “ओ सासूबाई, आता का पळताय? बोला ना, तुमची बोलती का बंद झाली? बाकी वेळेला तर मला ऐकवत असता, आता घाबरलात की काय?” अशा शब्दांत निरूपा आजीलाच जाब विचारते.

पंकज आणि देविकाचा आईस्क्रीमचा बेत

निरूपाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आजी मीराला घेऊन आत निघून जाते. त्यानंतर पंकज हळूच देविकाला म्हणतो की इथे उभे राहून त्याचे डोके भणभणत आहे, त्यामुळे बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊयात. देविका लगेचच तयार होते आणि “आई, आम्ही आलोच,” असे सांगून पंकजसोबत बाहेर पडते. दुसरीकडे रात्रीचे साडेआठ वाजलेले असतात आणि सत्य स्पर्धेच्या ठिकाणी अजूनही सायकल चालवत असतो.

सत्याची प्रामाणिक धडपड

स्पर्धेच्या ठिकाणी असलेले प्रेक्षक आता निघून गेलेले असतात, परंतु आयोजक मात्र तिथेच थांबलेले असतात. सत्याच्या शरीरातील ताकद कमी झालेली असते आणि तो अगदी हळूवारपणे सायकल चालवत असतो. काही वेळाने, काही प्रेक्षक परत येतात आणि सत्यासाठी जल्लोष करू लागतात. सत्याचा उत्साह पूर्वीसारखा नसतो, पण त्याचे प्रामाणिक प्रयत्न पाहून सर्वांनाच आनंद होतो. त्याचे हात अक्षरशः दुखू लागतात, पण तो हार मानत नाही. काही वेळाने त्याचे पायही दुखायला लागतात आणि पायात गोळे येतात. तो एका पायाने सायकल चालवत दुसऱ्या पायाला थोडं स्ट्रेचिंग करतो. त्याच्या हाताला मुंग्या येतात आणि डोळ्यासमोर अंधारी येऊ लागते.

पंकजने दिलेले धक्कादायक सरप्राईज

इकडे घरात निरूपा डोक्याला हात लावून शांतपणे बसलेली असते, तेवढ्यात पंकज आणि देविका तिथे येतात. पंकज मनातल्या मनात विचार करतो की, “ही नथ चोरली आहे खरी, परंतु यातले काही पैसे मम्माला द्यायला हवे होते, म्हणजे तिने टेन्शन घेतलं नसतं आणि जास्त बाऊ सुद्धा केला नसता.” जर हे प्रकरण अंगाशी आले तर काय होईल, या विचारात तो असतो. देविका निरूपाजवळ बसून विचारते की ती अशी का बसली आहे. त्यावर निरूपा काही नाही असे उत्तर देते. तेव्हा देविका तिला सांगते की पंकजकडे त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे. हे ऐकताच निरूपाला आश्चर्य वाटते, पण पंकज घाबरतच आपल्याकडे काही सरप्राईज नसल्याचे सांगतो. मात्र देविका त्याच्याकडे सरप्राईज देण्यासाठी हट्ट धरते.

कंपनीकडून मिळालेले इन्सेंटिव्ह

देविकाच्या हट्टामुळे पंकज हसून सांगतो की त्याने कंपनीला एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले, ज्यामुळे कंपनीने त्याला इन्सेंटिव्ह दिला आहे. हे ऐकून निरूपा घाबरते आणि त्या पैशांकडे पाहतच राहते. देविका विचारते, “अरे, डायरेक्ट इन्सेंटिव्ह? सॅलरी वगैरे नाही दिली का?” पंकज उत्तरतो की हे त्याच्यासाठी सुद्धा सरप्राईजिंग होते. तो देविकाला पैसे देतो आणि ती आनंदाने ‘थँक्यू’ म्हणते. त्यानंतर निरूपा पंकजकडे संशयाने पाहत विचारते, “काय रे, कुठून आणले हे पैसे?” तो हळूच सांगतो की पहिल्याच दिवशी फायदा करून दिल्यामुळे कंपनीने त्याला पैसे दिले. तो निरूपाच्या हातावरही काही पैसे ठेवतो, जे पाहून ती आश्चर्याने बघत राहते.

निरूपाचा संशय आणि लागलेला शाप

देविका विचारते, “काय झालं?” तेव्हा निरूपा लगेचच विषय टाळते आणि म्हणते, “बघ ना, किती चांगली गोष्ट आहे. माझा एक मुलगा मला सरप्राईज देण्यासाठी पैसे देतोय आणि दुसरा पोरगा माझीच नथ चोरून विकायला घेऊन गेलाय.” ती पंकजला दमला असशील तर आराम कर असे सांगते. त्यानंतर ती रागाने म्हणते, “माझी नथ चोरली ना, आता त्याचा पायच तुटू दे.” पण ती असे बोलताच तिथून जात असलेल्या पंकजचाच पाय लचकतो आणि तो ‘मम्मा, मम्मा’ ओरडतो. हे पाहून निरूपाला धक्का बसतो आणि ती काळजीने म्हणते, “बबड्या, अरे सांभाळून चालत जा ना. आता पाय तुटला असता ना! नुसता वेंधळ्यासारखा वागतो.” पंकजला जोरात लागले असल्यामुळे तो रडकुंडीला येतो आणि मनात म्हणतो, “मम्मा, तू तरी नको ना असे शाप वगैरे देऊ.” निरूपा त्याला काळजी न करता आराम करायला सांगते. पंकज गेल्यानंतर निरूपा त्या पैशांकडे पाहत राहते, तिच्या मनात वेगळाच संशय येत असतो.

मीराच्या आठवणीने आलेली नवी उमेद

रात्रीचे दोन वाजलेले असतात, तरीही सत्य बिचारा हळूहळू सायकल चालवत असतो. स्पर्धेचे आयोजन करणारे आयोजकही स्टेजवरच झोपी गेलेले असतात. न खाण्यापिण्यामुळे सत्याच्या डोळ्यांवर अंधारी येऊ लागते आणि त्याला झोप लागते, तितक्यातच त्याच्या डोळ्यासमोर मीराचा चेहरा येतो. मीराचा चेहरा आठवताच तो खाडकन डोळे उघडतो आणि पुन्हा नव्या जोमाने सायकल चालवू लागतो.

पाण्यासाठी सत्याची तडफड

काही वेळाने सत्याला खूप तहान लागते. तो स्टेजवर पाहतो, पण सगळेजण झोपलेले असल्यामुळे त्याला दुसरा पर्याय दिसत नाही. तो मोठ्याने आवाज देतो, “बाबांनो, पाणी तरी द्या,” पण सगळे गाढ झोपलेले असल्यामुळे कोणीही उठत नाही. त्यानंतर एका टेबलवर असलेली पाण्याची छोटी बाटली तो सायकल चालवता चालवता घेण्याचा प्रयत्न करतो, पण ती बाटली खाली पडते आणि सत्याला पाणी मिळत नाही.

मीराला लागलेली अनामिक हुरहुर

दुसरीकडे, मीरा शांतपणे झोपलेली असताना अचानक दचकून उठते आणि मोकळा श्वास घेते. तिला खूप विचित्र वाटू लागते, जणू काही सत्य अडचणीत असल्याची तिला जाणीव होते. तिला अचानक ठसका लागल्यामुळे आजी उठते आणि विचारते, “ए मीरा, काय झालं? अशी अचानक का उठलीस?” त्या लाईट लावून विचारतात की नक्की काय झाले आहे. तेव्हा मीरा सांगते, “आजी, मला जरा वेगळंच वाटतंय. माझ्या मनाला खूप हुरहुर जाणवत आहे. असं वाटतंय की हे एकटे पडले आहेत आणि यांना आपली खरंच खूप गरज आहे. त्यांच्याबरोबर काहीतरी विचित्र घडतंय.”

‘जिकरीच्या कामा’मुळे वाढलेली चिंता

आजी तिला समजावते की त्यालाही तिची आठवण येत असेल आणि फोन लागत नसल्यामुळे तिला असे वाटत असेल. पण मीरा म्हणते की आजच्या जगात मोबाईलमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून बोलता येते, मग जवळ असूनही संपर्क कसा होत नाही? ती म्हणते, “त्यांचा फोन बिघडलाय, चोरीला गेलाय किंवा डिस्चार्ज झालाय हे मी समजू शकते, पण ते गाडीवर आहेत, कुठे ना कुठे नेटवर्क तर मिळतच असेल ना?” हे ऐकून आजी अजूनच काळजीत पडते. मीरा विचारते, “आजी, ते तुमच्याबरोबर बोललेत ना? नक्की काय बोलले, तुम्हाला आठवतंय का?” आजी सांगते, “अगं, तुझ्यासाठी त्याला जास्त पैसे कमवायचे आहेत, म्हणून काहीतरी जिकरीचं काम आहे, ते केलं तर चालेल का, असं तो विचारत होता.” ‘जिकरीचं काम’ म्हणजे नक्की कोणते काम असेल, असा प्रश्न मीराला पडतो.

आजीचा धीर आणि सत्याची तळमळ

आजी सांगते की तिने विचारायचे विसरून गेली आणि ते काम घरी सांगितले तर कोणी करू देणार नाही, असेही तो म्हणाला होता. “मी त्याला म्हणाले की तू जे करशील, त्यात मी कायम तुझ्यासोबत असेन,” असे आजी सांगते. तेव्हा मीरा म्हणते, “आजी, माझं मन सांगतंय की ते कोणत्यातरी संकटात आहेत आणि आपण त्यांना शोधायलाच पाहिजे.” आजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की उद्या सकाळी हार घेऊन जाताना आपण दोघी जाऊ आणि बघू. हे ऐकून मीराला जरा बरे वाटते. आजी झोपते, पण मीराला पुन्हा जाग येते आणि ती सत्याच्याच विचारात असते. दुसरीकडे सव्वातीन वाजलेले असतात आणि सत्य अजूनही सायकल चालवत असतो. तो टेबलवरील दुसरी पाण्याची बाटली घेण्याचा प्रयत्न करतो, पण ती सुद्धा त्याच्या हाती लागत नाही.

सकाळचा शोध आणि मित्रांची भेट

सत्य कसातरी सायकल चालवत एका टेबलवरची पाण्याची बाटली उचलतो आणि तोंडानेच तिचे झाकण उघडून पाणी पितो. झोप येऊ नये म्हणून तो चेहऱ्यावर पाणी मारतो आणि पुन्हा सायकल चालवू लागतो. दुसरा दिवस उजाडतो, तेव्हा आजी आणि मीरा हार पोहोचवत पुढे चाललेल्या असतात. मीरा एका ताईंना हार देऊन सत्याबद्दल विचारते, पण त्या म्हणतात की दोन दिवस झाले तो दिसला नाही. हे ऐकून मीरा आणि आजीचे टेन्शन आणखी वाढते. पुढे त्यांना सत्याचा मित्र अवि भेटतो. मीरा त्याला विचारते की त्याने सत्याला कुठे पाहिले आहे का.

पक्याकडून मिळालेली धक्कादायक माहिती

अवि सांगतो की तो सत्याला आत्ताच भेटला होता, हे ऐकून मीरा आणि आजीला आनंद होतो. पण जेव्हा तो सांगतो की तो दोन आठवड्यांपूर्वी भेटला होता, तेव्हा मीराचा चेहरा पडतो. तो निघून गेल्यानंतर आजी म्हणते की आपण सत्याच्या सगळ्या मित्रांना भेटले पाहिजे. पुढे जात असताना मीराला सत्याची गाडी दिसते आणि ती आनंदाने गाडीजवळ धावत जाते. गाडीमध्ये पक्या झोपलेला असतो, हे पाहून मीरा आणि आजीला धक्का बसतो. आजी त्याला उठवते. पक्या आणि त्याचा मित्र गाडीतून खाली उतरतात. मीरा विचारते, “तुमच्याकडे गाडी आहे, म्हणजे तुम्हाला माहित असेल ना ते कुठे आहेत?” तेव्हा पक्या सांगतो की सत्यदादाने गाडीची पाच दिवस गरज नाही असे सांगितले आणि म्हणूनच त्याने गाडी घेतली. तो कुठे गेला आहे हे त्याला माहित नाही, हे ऐकून मीराला अक्षरशः धडकीच भरते.

आजीचा मित्रांना ओरडा

आजी पक्याला विचारते की गाडी घेताना त्याने विचारले का नाही की तो कोणते काम करणार आहे. त्यावर त्याचा मित्र म्हणतो, “आजी, आम्ही मित्रमित्र आहोत ना, एकमेकांना काही विचारत नाही. आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत.” हे ऐकून आजी वैतागते आणि म्हणते, “काय चाललंय तुमचं? मनाचे राजे म्हणजे काय पॅसेंजरला कुठेही सोडता का?” त्याचा मित्र चूक मान्य करतो आणि दादा आल्यावर वहिनीला फोन करून सांगतो असे म्हणतो. आजी चिडून म्हणते, “आता देऊ का एखादी ठेवून? तो घरी आल्यावर मीच त्याचा कान धरेन आणि मग तुझा सुद्धा.”

मित्रांकडूनही पत्ता लागेना

पक्या विचारतो की काही गडबड झाली आहे का. मीरा त्याला सांगते की सत्य पाच दिवसांसाठी कुठेतरी जाणार आहे असे म्हणाला, पण कुठे आणि काय करणार आहे, हे काहीच सांगितले नाही, त्यामुळे तिला खूप टेन्शन आले आहे. पक्या तिला धीर देतो आणि म्हणतो की तो लगेचच सगळ्या गँगला फोन करून विचारतो. तो आणि त्याचा मित्र लगेचच सगळ्या मित्रांना फोन लावू लागतात, पण सगळ्यांकडूनच नकार येतो. सत्या कुठेच दिसला नसल्यामुळे मीरा आणि आजीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि त्यांची काळजी आणखी वाढते.

अनपेक्षितपणे स्पर्धेच्या ठिकाणी दाखल

मीरा आता रडकुंडीला येते आणि म्हणते की हार पोहोचवायला उशीर होत आहे, त्यामुळे आपण निघूया. चालत चालत त्या हार देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी येतात. दिवस उजाडल्यामुळे तिथे प्रेक्षकांची गर्दी जमलेली असते. सत्या त्या गर्दीमध्ये सायकल चालवत असतो आणि एवढ्या प्रेक्षकांना पाहून त्याचाही मूड फ्रेश होतो. मीरा आणि आजी रिंगणाजवळ येतात. आजी विचारते, “इथे काय आहे?” मीरा म्हणते, “माहीत नाही, पण इथे हारांची मोठी ऑर्डर आहे.”

स्पर्धेच्या भयावहतेची जाणीव

आजी एका काकांना विचारते की इथे काय सुरू आहे. ते काका सांगतात, “इथे पाच दिवस सायकल चालवण्याची स्पर्धा आहे. एक माणूस कालपासून चालवतोय, पण मला नाही वाटत त्याला जमेल. पाच दिवस सायकल चालवणं सोपं नाही. अगोदरचे स्पर्धक तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत.” हे ऐकून मीरा आणि आजी आतमध्ये कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतात, पण गर्दीमुळे त्यांना काही दिसत नाही. तो माणूस पुढे सांगतो की मागच्या स्पर्धकांचे जगण्याची गॅरंटी सुद्धा डॉक्टरांनी दिलेली नाही. हे ऐकून आजी म्हणते की दोन लाख रुपयांसाठी लोक जीव धोक्यात घालत आहेत.

आयोजकांशी संवाद आणि वाढती चिंता

मीरा आयोजकांकडे जाते, पण तिला अजूनही सत्य दिसत नाही. ती आयोजकांना सांगते की स्पर्धेतील माणसाच्या परिस्थितीनुसार ती उद्या हार आणेल. आयोजक सांगतात की चार दिवस हार लागतील, पण पाचवा दिवस तो माणूस तग धरणार नाही, कारण आजपर्यंत कोणीही पाच दिवस टिकले नाही. हे ऐकून मीरा टेन्शनमध्ये येते. काका तिला विचारतात की तिला काही टेन्शन आहे का. तेव्हा मीरा सांगते की तिचा नवरा पाच दिवसांपासून कुठे गेला आहे हे सांगितले नाही, त्यामुळे तिला काळजी वाटत आहे. ते काका तिला धीर देतात आणि म्हणतात की महत्त्वाच्या कामासाठीच गेला असेल.

सत्याला न बघताच घराकडे परत

आजी आणि मीरा म्हणतात की असा कोणाचा जीव जाताना त्यांना बघवणार नाही. तेवढ्यात पाऊस सुरू होतो आणि त्या दोघी छत्री उघडून घरी जायला निघतात. दुसरीकडे, निरूपा झोपेतून जागी होते आणि “मीरा, चहा टाक” असा आदेश देते. पण मीराचा आवाज न आल्यामुळे ती इकडेतिकडे बघते. ती मीराच्या रूममध्ये जाऊन पाहते, तर तिथे मीरा नसते. “म्हातारी आणि फुलवाली सकाळी सकाळी कुठे गेल्यात?” असा प्रश्न तिला पडतो. ती स्वतःशीच म्हणते, “अच्छा, म्हणजे माझ्या नथीमुळे या फुलवालीचं नाक माझ्या मुठीत आलंय. काल मी पोलिसात जाण्याची धमकी दिली, म्हणूनच त्या पनवतीला शोधायला गेल्यात.” इकडे मीरा आणि आजी भर पावसात घरी येत असतात आणि दोघीही सत्याच्याच काळजीत असतात, पण आपण एकमेकांच्या इतक्या जवळ आहोत याची त्यांना खबर नसते.

पुढील भागाची हिंट

घरी जाण्यासाठी मीरा एक रिक्षा पाहते आणि लगेचच रिक्षामध्ये बसते. आजी सुद्धा बसते. काही वेळातच मीराच्या काहीतरी गोष्ट लक्षात येते आणि ती “रिक्षा थांबवा, रिक्षा थांबवा” असे म्हणते. तिकडे सत्य आपली सायकल अजूनही चालवतच असतो. मीरा विचार करत करत रिक्षातून खाली उतरते आणि धावतच स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पोहोचते. आजी तिच्या पाठोपाठ उतरते आणि “ए मीरा, काय झालं ग?” असे विचारत तिच्या पाठीमागे धावते.

Leave a Comment